पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यंदा आडसाली ऊस लागवडीमध्ये देखील वाढ होणार आहे. लागवड करत असताना पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ऊस लागवड शास्त्रीय पद्धतीने करावी. सुधारित ऊस जाती, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकता वाढवावी असे कृषी विभागाने सुचवले आहे.
आडसाली ऊस लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान करावी, असे कृषी विभागाने सुचवले आहे. भारी जमिनीत ५ फूट, तर मध्यम भारी जमिनीत २.७फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीची लांबी उतारानुसार २० ते २२ मीटर ठेवावी. एक डोळा पद्धतीने लागवड करताना डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतर ठेवावे, तर दोन डोळ्यांच्या टिपऱ्यांमध्ये अर्धा फूट अंतर ठेवावे. जोडओळ पट्टा पद्धतीसाठी मध्यम जमिनीत २.२ फूट आणि भारी जमिनीत २.३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
भारी जमिनीत कोरड्या पद्धतीने, तर हलक्या जमिनीत ओल्या पद्धतीने लागवड करावी, जेणेकरून उगवण चांगली होईल. आडसाली उसासाठी हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाशची शिफारस आहे. माती परीक्षणानुसार खतांचे प्रमाण ठरवावे. लागवडीपूर्वी १० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद आणि पालाश द्यावे. लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी ४० टक्के नत्र आणि १२ ते १४ आठवड्यांनी १० टक्के नत्र द्यावे. ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर केल्यास ५० टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरदाची बचत होऊ शकते. सेंद्रिय खतांसाठी हेक्टरी ५० ते ६० गाड्या शेणखत किंवा हिरवळीचे पीक जमिनीत गाडावे.
ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्र…
ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी आणि खतांचे कार्यक्षम व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर ४५, ६५ आणि ८५ दिवसांनी जिबरेलिक अॅसिड (५० पीपीएम) आणि विद्राव्य खतांची फवारणी केल्यास फुटव्यांची जाडी आणि प्रकाश संश्लेषण वाढते. महा डीबीटी शेतकरी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी अनुदान उपलब्ध आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारकांना ५५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळेल, यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून संच खरेदी करून ३० दिवसांत पावती अपलोड करावी. सन २०२५-२६ पासून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य लागू आहे. धोरण
नेमके काय आहे पंचसूत्री तंत्रज्ञान…
उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारित ऊस जातींची निवड, सरीमध्ये रोप लागवड, ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत यांचा समावेश आहे. सुधारित जाती जसे की फुले २६५, को ८६०३२ आणि को व्हीएसआय ९८०५ यांची निवड करावी, बेणे ९ ते ११ महिन्यांचे, रसरशीत आणि फुगीर डोळ्यांचे असावे. बेणे दर तीन वर्षांनी बदलावे.