पुणे : ऊस गाळप हंगाम सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची अपेक्षा

पुणे : उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढण्यासाठी उसाचे नवीन वाण तसेच तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर तीन ते चार महिन्यांमध्येच गाळप हंगाम संपतो. त्याचा फटका कारखानदारांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना बसतो. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सहा महिने सुरू राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.

द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे ७० वे वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडीअडचणी येत असतात. या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. देशात उच्चांकी ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.

या अधिवेशनात निरानी ग्रुप-संगमेश निरानी, ओंकार शुगर्स-बाबूराव बोत्रे पाटील, बारडोली-गुजरातचे भावेश पटेल, आंबेडकर शुगर-अरविंद गोरे, वारणा ग्रुप- विनय कोरे यांचा गौरव करण्यात आला. राजारामबापू साखर कारखाना, व्यंकटेश पॉवर अॅण्ड शुगर्स, नॅचरल शुगर, द्वारकाधीश शुगर, गणदेवी शुगर यांना उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार देण्यात आला. तांत्रिक तसेच जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण झाले.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, आमदार अभिजित पाटील, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अॅण्ड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन. चिनप्पन, द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here