पुणे : बारामतीमध्ये ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती कृषि विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या ऊस पिकातील एआय प्रकल्पाने शेती क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. ऊस पीक उत्पादनात वाढ, पाण्याची बचत , रासायनिक खते, कीडनाशकांचा काटेकोर वापर, संभाव्य कीड- रोगांबद्दल पूर्वसूचना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडेल अशी प्रणाली बनवणे हा प्रकल्पाचा उद्देश होता. एआय तंत्रज्ञान शेती आणि पीक पद्धतीबाबत माहिती गोळा करते. यासाठी जमिनीवरील सेन्सर्स आणि उपग्रह व ड्रोनच्या प्रतिमांच्या आधारे माहिती गोळा करून डेटा तयार केला जातो.
स्वयंचलित हवामान केंद्र ५ किलोमीटर व्यासातील हवामानाची माहिती दर तासाला नोंदवते. जमिनीतील ओलावा मोजणारे सेन्सर शेतकऱ्यांना जमीन वापसा स्थितीत आहे की नाही याची माहिती देते. पिकाला पाणी द्यायचे की थांबवायचे हे लगेच कळते. शेतकऱ्याच्या मोबाईलवर माहिती पाठवली जाते. शेतकऱ्यांना तातडीने पीक व्यवस्थापन सल्लादेखील दिला जातो. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. कंप्युटर व्हिजन, रिमोट सेंसिंग आणि मशीन लर्निंग यातून पीक वाढ, पाणी आणि खताची गरज, तसेच रोग-कीडींचा संभाव्य धोका ओळखून शेतकऱ्याला मोबाईलवर सोप्या भाषेत आणि नेमक्या सूचना पाठविल्या जातात. यातून हलक्या जमिनीमध्ये जेथे एकरी ४० ते ४२ टन उत्पादन मिळायचे, त्याठिकाणी ९५ ते ९६ टन उत्पादन मिळाल्याची नोंद झाली आहे. पाण्याची बचत सुमारे ५० टक्के इतकी झाली आहे. १२० टन ऊस उत्पादनासाठी फक्त ८४ लाख लिटर पाणी वापरले गेले. खतांचा वापर कमी झाला आहे. एकंदर प्रति टन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढला आहे. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी सांगितले की, शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान वापरल्याने पीक उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. सुरुवातीला थोडा खर्च आणि प्रशिक्षण आवश्यक असले तरी, दीर्घकालीन फायदे चांगले आहेत.

















