पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत विरोधकांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण करत दुसरी सुरू केली आहे. सांगवी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी सत्ताधाऱ्यांकडून समेटासाठी प्रयत्न झाल्याचे सांगितले, तर रंजन तावरे यांनी विरोधकांवर सडकून टीका करत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. मात्र सत्ताधाऱ्यांनी अद्याप प्रचारास सुरुवात केली नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तडजोड करण्याची भूमिका घेतील, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सभासदांमध्ये जाऊन भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. कष्टकरी शेतकरी समितीने यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे व रंजन तावरे या पारंपरिक विरोधकांतील वाद संपवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली तर काही समेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशावेळी किती पॅनल होणार? कुणाचे होणार ? याबाबत सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सहकारमहर्षी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी संभाव्य उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र गावोगावी जाऊन प्रचारास सुरुवात केली नसल्याचे चित्र आहे.