पुणे : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ‘ब’ गटातील १०२ मतदारांवर अजितदादांचे लक्ष

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण ६ गटातून १९ हजार ५४९, तर ‘ब’वर्गातून १०२ सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ‘ब’ गटातील १०२ मतदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. सहा गटांतील मतदारंसाठी विभागून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवर सुविधा देण्यात आल्या असून ‘ब’ वर्ग संस्था मतदार संघ या गटातील १०२ मतदारांसाठी प्रशासकीय भवन हे एकमेव मतदान केंद्र आहे.

कारखान्याच्या माळेगाव गटात माळेगावमध्ये सर्वाधिक २९६५ मतदार आहेत. तर माळेगाव बुद्रुकमध्ये १७६७, माळेगाव खुर्दमध्ये ५८०, येळेगावमध्ये १९४, पाहुणेवाडीमध्ये १४०, ढाकाळे येथे २८४ मतदार आहेत. गट क्रमांक २ पणदरेमध्ये ३७९६ मतदार आहेत. या गटात पणदरे, मानाप्पाचीवाडी, पवईमाळ, सोनकसवाडी, कुरणेवाडी, धुमाळवाडी, खामगळवाडी या गावांचा समावेश आहे. सांगवी गटात २४८७ मतदार असून सांगवीसह कांबळेश्वर, शिरने, पांढरेवाडी, पिंगळेवाडी ही गावे या गटात आहेत. गट क्रमांक चार खांडज-शिरवलीत २३७९ मतदार असून खांडज, शिरवली या दोनच गावांचा यात समावेश आगे. गट क्रमांक ५ निरावागजमध्ये ३५०६ मतदार असून निरावागज, मेखळी, सोनगाव, घाडगेवाडी ही गावे यात आहेत. सर्वाधिक मतदार बारामती गटात, ४४१६ असून यात बारामतीसह मळद, मेडद, गुणवडी, डोरलेवाडी, राजाळे-सांगवी, वीरपुरी-दहिगाव, कऱ्हावागज, नेपतवळण, बऱ्हाणपूर, उंडवडी सुपे, उंडवडी क. प., जराडवाडी आणि सोनवडी या गावांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here