पुणे : सिरपपासून साखर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी यंत्रसामुग्रीमध्ये बदल करण्यास सोमेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते. याचबरोबर कारखान्याच्यावतीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, गोदाम दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली. सभेत अंतिम ऊसदरात वाढ करून सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी सभासदांनी मागणी केली. मात्र, मागणीला यश आले नाही. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. सभेत विविध विषयांवर सभासद, संचालक मंडळामध्ये चर्चा झाली. प्रमोद काकडे यांनी संचालकांनी नात्यातल्या लोकांची कामगार भरती केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राजेंद्र जगताप यांनी साखर मूल्यांकन माळेगाव प्रमाणे ३७५० धरा आणि ऊसदर वाढवा, अशी मागणी केली. यावर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी मुद्देसुद उत्तर देत खुलासा केला. सिरपपासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्पास १३ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी कारखाना जिल्हा बँककडून ७० आणि स्वभांडवलातून ३० टक्के रक्कम, तर सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करणार असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. यावेळी शहाजीराव काकडे, सतीशराव काकडे, प्रमोद काकडे, विजयकुमार सोरटे, सतीश खोमणे, दिलीप फरांदे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, भाजप नेते दिलीप खैरे, माणिकराव झेंडे उपस्थित होते.