पुणे : जिल्ह्यात यंदाच्या २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात १३ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम रू आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच खासगी साखर कारखान्यांनी ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. त्यामध्ये बारामती ॲग्रो अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ दौंड शुगर व श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यांनी चांगले गाळप केले आहे. सर्व १३ कारखान्यांनी शुक्रवारअखेर सुमारे १४,८३,५५३ मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. म्हणजेच १३ साखर कारखान्यांचे ऊस गाळपातून १४.८३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयातील कृषी अधिकारी शेषराव डोळे यांनी दिली.
कृषी अधिकारी डोळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सद्यःस्थितीत ८ सहकारी साखर कारखान्यांकडून ६,०९२,२४ मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर पाच खासगी कारखान्यांनी त्यापेक्षा अधिक म्हणजे ७,९१,५२९ मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी कारखान्यने ९०,७०१ मे.टन, बारामतीच्या दि माळेगाव सहकारी कारखान्याने १,१६,८५० मे. टन तर जुन्नरच्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ७४,२८६ मे. टन ऊस गाळप केले आहे. दौंडमधील भीमा पाटस येथील श्री साईप्रिया शुगर्स लिमिटेडने ८१,००१, बारामतीमधील सोमेश्वर सहकारी कारखान्याने १,१४,५२४ मे. टन ऊस गाळप केले आहे. मुळशीतील संत तुकाराम सहकारी कारखान्याने ३३,८२५ मे. टन गाळप केले आहे.

















