पुणे : माळेगाव साखर कारखान्याची रणधुमाळी, यंत्रणा लागल्या कामाला

पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारुढ निळकंठेश्वर पॅनेल व विरोधकांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलने घरोघरी प्रचार पत्रके वाटपावर भर दिला आहे. सत्तारुढ गटाने या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कारखान पुन्हा जिंकायच्या उद्देशाने रणनीती आखली आहे. तर विरोधी मंडळींनी अस्तित्व सिद्ध करून दाखविणे हे ध्येय ठेवले आहे. सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्व सध्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप व ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे यांच्याकडे देण्यात आले आहेत. तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व चंद्रराव तावरे, रंजन तावरे करीत आहेत.

कारखाना निवडणूक तिरंगी अथवा चौरंगी लढत होईल, असे चित्र सध्यातरी मैदानात प्रचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कृतीवरून दिसून येते. सत्ताधारीचा निळकंठेश्वर पॅनेल, विरोधकांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, शरद पवार पक्षाचे बळिराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समितीने आपल्या प्रचारानिमित्त स्वतंत्र हालचाली सुरू ठेवल्या आहेत. बळीराजा पॅनेलच्या संभाव्य उमेदवारांनी गटनिहाय गावोगावी कोपरा बैठकांच्या माध्यमातून सभासदांना आपलेसे करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू ठेवला आहे. सत्तारुढ आघाडीने आतापर्यंत दिलेला दर, सभासदांसाठी राबविलेल्या योजना आणि आगामी धोरण याची मांडणी पत्रकातून केली आहे. तर विरोधकांकडून सत्तारुढ आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडत ऊस तोडणीचे गैर नियोजन, कर्जाचा दुरुपयोग, कामगार पगारवाढीतील त्रुटी आदी प्रश्न उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here