पुणे : भीमा पाटस साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. कारखान्याची ४३वी वार्षिक सभा शनिवारी पाटस येथे झाली. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल सभेच्या अध्यक्षस्थानी होते. एमआरएन भीमा कारखान्याने यापुर्वी २८०० रुपये उसाचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे. नुकतेच कारखान्याने २०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे असे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले. निराणी ग्रुप कामकाज पाहते, तर संचालक मंडळ संस्था म्हणून व्यवस्थापन पाहते. मात्र काही आततायी लोकांमुळे कामगारांचे देणी न्याय प्रविष्ट झाली. त्यामुळे पाच कोटी रुपयांचे थकीत देणी लांबली आहेत. कामगारांचे नुकसान झाले आहे. सर्व कामगारांची देणी देण्यास आम्ही बांधील आहोत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, थकीत कर्जामुळे भीमा पाटस कारखान्याचा लिलाव पुणे जिल्हा बँकेने केला, असे मत कुल यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. त्यास रमेश थोरात यांनी जोरदार आक्षेप घेतला. या विषयावर सोमवारी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल असे सांगण्यात आले. सभा दोन तास चालली. आवाजी मतदानाने सर्व विषय मंजूर झाले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी स्वागत केले. कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक तुषार पवार यांनी विषय वाचन केले. वैशाली नागवडे यांनी सभासदांना दिवाळीला २० किलो साखर द्यावीत अशी मागणी केली. यावेळी वैशाली नागवडे, मनोज फडतरे, अभिमन्यू गिरमकर, अशोक हंडाळ, अतुल ताकवणे, नितीन म्हेत्रे, अनिल नागवडे आदींनी चर्चेत भाग घेतला.