पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथील एम. आर. एन. भीमा शुगर ॲण्ड पॉवर प्रा. लि (निराणी शुगर्स लि.) कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने १२ जानेवारीपर्यंत ५ लाख ४० हजार ८४८ टन ऊस गाळप केला असून, ५ लाख ३१ हजार ५० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. कारखान्याने उसाला प्रतीटन ३,१०० रुपये पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा केला आहे. तर १६ जानेवारीनंतर गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन २०० रुपये जादा दिला जाईल. या उसाला प्रतिटन ३३०० रुपये ऊस दर दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.
कारखान्याने या वर्षी इतिहासात प्रथमच एका दिवसात ११ हजार टन ऊस गाळप केले आहे, अशी माहिती एमआरएन भीमाचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, कारखान्याने सरासरी साखर उतारा ११.३४ टक्के राखला आहे. डिस्टीलरी प्रकल्पातून आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ८६३ लिटर उच्च प्रतीचे इथेनॉल उत्पादीत केले असून, २६,७७,३२१ लिटर रिक्टिफाईड स्पिरिट उत्पादित केले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २,१७,५९,५३७ युनिट वीज निर्मिती केली असून, १ कोटी ६७ लाख ५८ हजार २३७ युनिट स्ववापर करून ५१ लाख ८२ हजार २०० युनीट वीज निर्यात केली आहे. निराणी ग्रुपचे अध्यक्ष मुरुगेश निराणी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर संगमेश निराणी, ग्रुपचे कार्यकारी संचालक विजय निराणी, संचालक विशाल निराणी यांनी सर्वांचे आभार मानले.

















