पुणे : भीमाशंकर कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेने दरवर्षी जास्त बाजारभाव दिला आहे. मागील गाळप हंगामात सभासद व गेटकेन, असा भेदभाव न करता सरसकट ३२९० रुपये दर दिला. आतापर्यंत ‘भीमाशंकर’ ने एफआरपीपेक्षा ५२९ कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त दिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आडून कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. देशात सात वेळा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवलेला एकमेव कारखाना आहे. कारखान्यालाही भविष्यात १० हजार टनांपर्यंत गाळप क्षमता न्यावी लागणार आहे. त्यातून जास्त वीज, मोलॅसिस व इथेनॉल तयार केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दत्तात्रेयनगर-पारगाव येथे कारखान्याची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होती. वळसे पाटील म्हणाले, “मागील वर्षांच्या सभेत झालेला गोंधळ शोभनीय नव्हता. मागच्या वर्षी मला भाषण करता आले नाही. परंतु झालेल्या प्रकाराने ‘भीमाशंकर’च्या नावाला काही प्रमाणात कमीपणा आला. कारखाना कोणत्याही कुटुंबाचा नाही तर समाजाचा आहे. त्याला जपले पाहिजे. सभासदांनी प्रश्न विचारावेत. संचालकांनी प्रश्न विचारणे, प्रथेला धरून नाही. राज्याच्या राजकारणात ३५ वर्ष काम करत असताना विरोधी पक्षातील किंवा सत्ताधाऱ्यांमधील कोणीही माझ्यावर साधा आरोप केला नाही. यावेळी माजी खासदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, शंकर पिंगळे, सुषमा शिंदे, अरुणा थोरात, अनिल वाळुंज, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व सर्व संचालक उपस्थित होते.