पुणे : भीमाशंकर कारखान्यातर्फे ऊस तोडणी मजुरांसाठी प्रथमोपचार कीटचे वाटप

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विभागीय शेतकी गट कार्यालयांसाठी प्रथमोपचार किटचे वाटप कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असताना मजुरांना कामादरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, या सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी सांगितले. तर पुढील काळातही मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील, अशी घोषणा कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केली.

ऊस तोडणीदरम्यान कोयत्याने कापणे, घसरून पडणे, किरकोळ जखमा होणे अशा घटना घडत असतात. अशा वेळी जवळच प्रथमोपचार किट उपलब्ध असल्यास मजुरांवर तात्काळ उपचार करणे शक्य होते व गंभीर प्रसंग टाळता येतात. असे सांगण्यात आले. ऊस तोडणीच्या काळात मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असतो. कारखान्याने प्रथमोपचार किट दिल्यामुळे अपघात झाल्यास त्वरित उपचार शक्य होणार असून हा भीमाशंकर कारखान्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे असे अवसरीचे उद्योजक राधेश्याम शिंदे यांनी सांगितले. कीट वाटप प्रसंगी साखर उद्पादन प्रमुख किशोर तिजारे, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, गटप्रमुख तसेच शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here