पुणे : भीमाशंकर कारखान्याकडून तीन कोटी रुपयांची ऊस बिले अदा

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबरअखेर दोन लाख १२ हजार ५८६ मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. यासाठी देय एफआरपी. ३२७२.१४ रुपये प्रतिटन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ता. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या उसास प्रथम हप्ता ३१०० रुपये प्रतिटनाप्रमाणे अदा केलेला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी एफआरपी रक्कम ३२७२.१४ रुपये येत असून उसाला ३२७३ रुपये प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

याबाबत अध्यक्ष भेंडे म्हणाले की, पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता ३१०० रुपये प्रतिटन वजा जाता उर्वरित १७३ रुपये टनाप्रमाणे एकूण रक्कम तीन कोटी ६७लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग करणात येणार आहेत. कारखान्याने प्रथम हप्ता अदा करते वेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफआरपीची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफआरपीचे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे, असे भेंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here