पुणे : माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रेय वळसे- पाटील यांनी पाहिलेले स्वप्न माजी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी भीमाशंकर साखर कारखान्याच्या माध्यमातून साकार केले आहे. या संस्थेला कोणतेही गालबोट लागू दिले नाही. कारखान्याने देश व राज्य पातळीवर २९ पारितोषिके मिळवून नावलौकिक मिळवला आहे. मात्र, कोणीतरी रमेश येवलेंसारखे येऊन सवंग लोकप्रियतेसाठी आरोप करत दिशाभूल करत आहेत अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केली. कारखान्याला बदनाम करण्याचे प्रकार थांबवावे, अन्यथा कायदेशीर सल्ला घेऊन संबंधित व्यक्तींवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा त्यांनी दिला. पारगाव येथे कारखाना स्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील, संचालक बाबासाहेब खालकर, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष बेंडे म्हणाले की, कारखान्याला गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी नफा झाला. तरीही यावर्षी शेतकऱ्यांना २१० रुपयांचा अंतिम हप्ता दिला आहे. हा हप्ता चालू वर्षीच्या वाढाव्यातून वाटून दिला आहे. त्यामुळे यावर्षी नफा कमी दिसत आहे. गेल्यावर्षीच्या ४२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या तुलनेने यावर्षीच्या कर्जात ३६ कोटीची वाढ होऊन ४६२ कोटी रुपये झाले आहे. यावर्षी गाळप वाढले, खर्च वाढला डिस्टिलरी, सहवीज निर्मितीसाठी कर्ज घेतले, साखर, मोलॅसिसचा शिल्लक साठा वाढला आहे. त्यामुळे हे कर्ज वाढले आहे. कर्ज कशासाठी घेतले याचा उल्लेख अहवालात आहे. कर्जाची परतफेड नियमित सुरू आहे. मागील हंगामात गाळप केलेल्या एकूण उसाच्या फक्त ३.७२ टक्के ऊस ५० किलोमीटरच्या बाहेरून आणला आहे. फक्त २ टक्के ऊस बिगर नोंदीचा आहे. प्रत्यक्ष उतारा वाढला आहे. दरम्यान, कारखान्याचा आर्थिक ताळेबंद सर्वांना दिसतो, पण त्याचे आर्थिक विश्लेषण कोणी करत नाही,’ असे रमेश येवले यांनी एकलहरे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.