पुणे : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन, पुणे व कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक, सभासदांची साथ यामुळे शक्य झाले आहे. आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्यस्तरावरील १७ असे ३० पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.
याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला दिलेला दर, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था, व्यवस्थापनातील पारदर्शकता, कारखान्याच्या व्यापक विकासासाठी इथेनॉल प्रकल्प, को-जनरेशन प्रकल्प, प्रेसमड व बायो-फर्टिलायझर उत्पादन, कचरा व्यवस्थापनाचा योग्य मेळ घालून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. व्यवस्थापनाच्या या गुणांचा अभ्यास करून सहकार मूल्यांवर आधारित प्रगत, पारदर्शक आणि समाजाभिमुख कामगिरीचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सहकार मंथन कार्यक्रमात कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉ. विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त संजय कोलते, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे चेअरमन गौतम कोतवाल आदी उपस्थित होते.
















