पुणे : भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता, यंदा ९ लाख २७ हजार पोती साखर उत्पादन

पुणे: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाला. कारखान्याने यंदा ८,८३,०६९ मे. टन ऊस गाळप करून ९,२७,१९७ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याने सन २०२५- २६ गाळप हंगामात १५ फेब्रुवारी अखेर गाळप केलेल्या ऊसासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ३,२७३ रुपये प्रती टनाप्रमाणे रुपये २८० कोटी अदा केले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेतील सुविधांचा लाभ घेवून ऊस लागवडीवर व उत्पादन वाढीवर भर द्यावा. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आधुनिक सोयीसुविधा व सतत वेळेवर दिलेल्या योग्य दरामुळे कारखान्याने मिळविलेल्या विश्वासाच्या जोरावर यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले की, भीमाशंकर कारखान्यामार्फत कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० ही महत्त्वाकांक्षी योजना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते. या योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, माती व पाणी परीक्षण सुविधा, उधारीवर ताग व ऊस बेणे वाटप, ऊस रोपवाटिका, खाजगी ऊस लागवड व ठिबक सिंचन अर्थसहाय्य केले जाते. यंदा कारखान्याने गाळप हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत ऊस पिकाबाबत अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here