पुणे : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करू नये. नर्सरीतील प्रामाणित ऊस रोपांची लागवड, ठिबक सिंचनाचा अवलंब, एकात्मिक खत, तण आणि कीड व्यवस्थापणाचा अवलंब करावा. कारखाना चालू गळीत हंगामात भीमाशंकर कारखाना कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब करणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित यांनी केले. चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील हनुमान मंदिर सभागृहात कारखान्यामार्फत ऊस विकास योजना, आडसाली लागवड, व्यवस्थापन आणि भविष्यातील एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती या विषयावर दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. कारखाना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब करणार आहे. त्यासाठी कारखान्याचे कर्मचारी या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देण्याचे काम करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊस विकास अधिकारी दीक्षित म्हणाले की, चांडोली बुद्रुक, दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील लक्ष २०२० च्या हेक्टरी १३० मेट्रिक टन सरासरी ऊस उत्पादनाचे उदिष्ट असलेल्या महत्वाकांक्षी ऊस योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. चास, वळती व वडगाव काशिंबेग येथेही कारखान्यामार्फत मेळावा झाला. ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक यांनी आडसाली लागवड, व्यवस्थापन व विविध योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. अशोक भोर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप थोरात यांनी आभार मानले.महेंद्र वाळुंज, अक्षय शेळके, प्रवीण घेवडे, भास्कर सैद आणि नितीन कोल्हे यांनी संयोजन केले.












