पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कारखान्याने ऊस तोडणी मशीनला बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी कामगारांच्या टंचाईमुळे भविष्यात हार्वेस्टर मशीनद्वारे तोडणी अपरिहार्य ठरणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, गेल्या हंगामात इथेनॉल उत्पादन प्रकल्प कमी क्षमतेने कार्यरत असतानाही कारखाना तोट्यात नव्हता. यंदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल, ज्यामुळे कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होईल. शेतकऱ्यांसाठी ही समाधानाची बाब आहे. कारखान्याने गेल्या हंगामात ११ लाख ८० हजार टन गाळप पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. दरम्यान, माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, भविष्यात हा कारखाना देशातील आघाडीचे साखर उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल. शेतकऱ्यांनी ८६०३२ या उच्च उत्पादकतेच्या उसाच्या जातीची लागवड करावी. यामुळे एकरी १०० टनांपर्यंत ऊस उत्पादन शक्य होईल. कारखान्यातर्फे दिवाळीनिमित्त कामगारांना २० टक्के बोनस देण्याची घोषणाही वळसे पाटील यांनी केली.