पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२४-२५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिटनासह अंतिम ऊसदर ३,२९० रुपये प्रतिटन जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
भीमाशंकर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ३८ हजार ४९६ टन उसासाठी यापूर्वी एफआरपीनुसार ३,०८० रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण ३५० कोटी ६६ लाख रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. अंतिम हप्ता २१० रुपये प्रतिटन निश्चित केला असून, शिक्षण संस्था निधी १० रुपये प्रतिटन व भाग विकास निधी २५ रुपये प्रतिटनाप्रमाणे ३५ रुपये प्रतिटन वजा जाता उर्वरित १७५ रुपये प्रतिटन अंतिम हप्त्याची एकूण रक्कम १९ कोटी ९२ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करणार आहे. गाळप हंगाम २०२५-२६ करिता कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस द्यावा, असे आवाहन बेंडे यांनी केले.