पुणे : छत्रपती कारखान्याच्या गळीत हंगामाची समाप्ती, २३६ कोटींची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

पुणे : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे ‘वजन चोख, पैसे रोख’ या तत्वानुसार हंगामात गळीत झालेल्या संपूर्ण उसाचे एकूण रक्कम २३६ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम अदा केले आहे. गळीत हंगाम २०२५- २०२६ या गळीत हंगामात शेवटच्या पंधरवड्यात गळीतास आलेल्या उसाचे १८ कोटी १८ लाख रुपयांचे पेमेंट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कारखान्याने गळीत हंगामात १०४ दिवसांत ७ लाख ५६ हजार २८५ टन उसाचे गाळप केले असून सरासरी साखर उतारा ११.३६ टक्के इतका मिळालेला आहे. कारखान्याने वाहतुकीची पंधरावडा बिले ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना अदा केली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अध्यक्ष जाचक यांनी सांगितले की, कारखान्याच्या मागील दहा हंगामातील साखर उताऱ्याच्या तुलनेत उच्चांकी आहे. यावर्षी कारखान्याचे कार्यक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट झाली. परिणामी ऊस गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण झालेले नाही. सभासदांनी चालू गळीत हंगामात रोपांची लागवड केलेला ऊस पुढील गळीत हंगामात गळीतास आल्यानंतर उसास प्रति टन रुपये १०० रुपयांप्रमाणे अनुदान अदा करण्यात येणार आहे. ऊस रोपे लागवडीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी ऊस रोपे लागवडीतून जास्त उत्पादन घेणाऱ्या प्रथम तीन सभासदांना बक्षीस देण्यात येणार आहे. मात्र रोपांची लागवड केलेला ऊस सभासदांनी आपल्याच कारखान्यास गळीतास देणे बंधनकारक आहे. ज्या सभासदांना ऊस रोपे खरेदी करावयाची असतील, त्यांनी कारखान्याचे ऊस विकास विभागाकडे संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here