पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधकांशी युती की लढत, याचा निर्णय होणार का? याकडे कार्यक्षेत्रातील इच्छुक आणि कार्यकर्ते, सभासदांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांचा गट आणि विरोधकांनीही कार्यक्षेत्रात चाचपणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील वातावरण तापू लागले आहे.
माळेगाव कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात आहे. काही इच्छुक उमेदवारांनी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विरोधी गटातील तावरे गुरू-शिष्यांनी मागील तीन दिवसांपासून कार्यक्षेत्रात प्रचारालाच सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी सभासदांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युगेद्र पवार कारखाना कार्यक्षेत्रातील उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.
या निवडणुकीत पहिल्यापासूनच सक्रिय असलेल्या कष्टकरी शेतकरी कृती समितीने निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने उमेदवारांच्या मुलाखती घेत तसेच कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गाठीभेटी घेऊन अगोदरपासूनच पॅनेलची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तावरे गुरू शिष्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि कष्टकरी शेतकरी समिती हे पॅनल उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
‘श्री छत्रपती’च्या यशाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकडे लक्ष
‘श्री छत्रपती’च्या मोठ्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘माळेगाव साठी नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. निरा खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव व श्री छत्रपती या तिन्ही सहकारी साखर कारखान्यांवर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. ‘माळेगाव’चा इतिहास पाहता पवार यांना येथील सभासदांनी धक्का दिल्याची उदाहरणे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने अजित पवार यांच्याकडे सध्या बारामती तालुक्यासाठी तितकासा वेळ नाही. या पार्श्वभूमीवर ‘श्री छत्रपती प्रमाणे सर्वपक्षीयांना एकत्र करून संघर्ष कमी करीत निवडणूक एकतर्फी कशी होईल, यादृष्टीनेच त्यांच्याकडून प्रयत्न होतील, असे बोलले जात आहे.
‘माळेगाव’च्या प्रचाराला इच्छुकांना मिळणार अवघे सातच दिवस
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी अवघ्या सात दिवसांचा अवधी मिळणार आहे. हा कालावधी अत्यंत अपुरा असल्याची अनेक इच्छुकांची तक्रार आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (ता. २१) जाहीर झाला. त्यामध्ये बुधवारपासूनच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, २७मेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. यातही दोन दिवस सुट्टी असल्याने प्रत्यक्षात पाचच दिवस या प्रक्रियेसाठी मिळणार आहेत. ज्या उमेदवारांना खरोखरीच निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज २७ मेपर्यंत दाखल केल्यानंतरही त्यांना चिन्ह मिळण्यासाठी १३ जूनपर्यंतची वाट बघावी लागणार आहे.
ग्रामीण भागात कोणत्याही निवडणुकीचा प्रचार हा निवडणूक चिन्हाच्या मदतीनेच होतो. त्यामुळे १३ जूनपर्यंत इच्छा असूनही इच्छुकांना चिन्हाअभावी प्रभावी प्रचारच करता येणार नाही, अशी स्थिती असल्याचे काही जणांनी निदर्शनास आणून दिले. अर्ज दाखल करण्यासाठी पाच, तर प्रचारासाठी सातच दिवसांचा कालावधी, मात्र अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल सोळा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जात नाहीत, तोवर चित्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे सात दिवसांत प्रचार कसा करायचा, असा प्रश्न इच्छुकांपुढे आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राचा विचार करता सात दिवसात सभासदांपर्यंत कसे पोहोचणार, याची चिंता सर्वांनाच आहे. यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, निवडणूक प्राधिकरणाने निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच कार्यक्रम अंतिम केला आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोळा दिवस का, हाच खरा प्रश्न यात आहे.