पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे तसेच सर्व संचालक मंडळ दिवस-रात्र कारखान्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन कामकाजाची पाहणी केल्यामुळे गाळप प्रक्रियेला गती मिळाली आहे. या उद्दिष्टाप्रती ऊस गाळपाची वाटचाल वेगाने सुरू असून आतापर्यंत ६ लाख मे. टनच्या आसपास गाळप झाले आहे. कारखान्याने ५ लाख ९० हजार ३०६ मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. छत्रपती कारखान्याने संचालक मंडळ, अधिकारी, कामगार आणि ऊस उत्पादक सभासदांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे उद्दिष्ट निश्चितच गाठले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ऊस गाळपावर दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसते की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ६,८७,३४४ मे. टन ऊस गाळप केले आहे. तर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ७,२२,३६५ मे. टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. पाटसच्या भीमा सहकारी साखर कारखान्याने ५,६१,६८३ मे. टन गाळप केले आहे. तर निवृत्तीनगरच्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात ५,७६,२४० मे. टन गाळप झाले आहे. अवसरी बुद्रुकच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ६,१७,६४० मे. टन तर कासारसाईच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने २,२१,३२५ मे. टन गाळप केले आहे. बारामती ॲग्रो लि. कारखाना १५,१३,१८० मे. टन गाळप करून अव्वल स्थान राखून आहे. दौंड शुगर प्रा. लि., आलेगावने १३,४५,५६० मे. टनाचे तर राशिनच्या श्री अंबालिका शुगर प्रा. लि.ने १०,८९,८४५ मे. टनाचे गाळप करून घोडदौड सुरू ठेवली आहे.

















