पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने १६ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये गाळप केलेल्या उसाचे ३७.१५ कोटी रुपये २५ डिसेंबरच्या सुट्टीमुळे एक दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. संचालक मंडळ वजन चोख, पैसे रोख… या शब्द प्रयोगानुसार रात्रंदिवस काम करीत आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यातील २९.९८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केले होते. तसेच तोडणी व वाहतुकीचे पहिल्या पंधरवड्यातील दोन कोटी पाच लाख रुपये वाहतूकदारांच्या खात्यावर जमा केले आहेत. अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, व्यवस्थापक हनुमंत करवर यांनी ही माहिती दिली.
छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे व संचालक मंडळाने सांगितले की, कारखान्याने ५३ दिवसांत चार लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून दुसऱ्या पंधरवड्यातील ३७.१५ कोटी रुपयांचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. गळीत हंगामास एक नोव्हेंबरपासून सुरवात झाली आहे. कारखान्याने मंगळवारी (ता. २३) ४,००,६७६ टन ऊस गाळप केले. चार लाख २३ हजार २०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १ कोटी २६ लाख ५००० युनिट वीज महावितरणाला विक्री करण्यात आली आहे. सभासद, कामगार, कर्मचारी सहकार्य करीत असल्यामुळे कारखान्याने गाळपात आघाडी घेतली आहे. संचालक मंडळाने १२ लाख मेट्रीक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याची मंगळवारी (ता. २३) उसाची रिकव्हरी ११.५५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. सरासरी रिकव्हरी १०.७९ टक्के झाली असून रिकव्हरीत वाढ झाल्यामुळे सभासदांना वाढीव दर मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.

















