पुणे : भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल प्रतिटन ३१०१ रुपये जाहीर केली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवारी (ता. १) चालू गाळप हंगामातील उसाचा पहिला हप्ता जाहीर केला. १० डिसेंबर रोजी गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. कारखाना सभासद व गेटकेन धारकाच्या उसाला समान भाव देण्यात येणार आहे. उशीरा तुटणाऱ्या खोडवा उसाला पहिला हप्ता ३२०१ रुपये व सुरू व पूर्व हंगामी उसाला ३१७६ रुपये मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या साखरेच्या उताऱ्यामध्ये सरासरी एक टक्याने वाढल्यामुळे २०२६ च्या दिवाळीला देखील शेतकऱ्यांना चांगले पैसे देता येतील, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी उचल ठरली आहे. इंदापूर, बारामतीसह जिल्हातील सहकारी साखर कारखान्यांचे याकडे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे संचालक मंडळ पारदर्शक कारभार पाहत आहे. कारखान्यात ओव्हर हॉलिंगची व दुरुस्ती कामे चांगली केल्यामुळे सातत्याने आठ हजार टनापेक्षा अधिक गाळप होत आहे, असे अध्यक्ष जाचक व उपाध्यक्ष गावडे यांनी सांगितले. यावेळी संचालक शिवाजी निंबाळकर, ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, अशोक जाधव, हनुमंत करवर उपस्थित होते.


















