पुणे : छत्रपती साखर कारखाना लकी ड्रॉद्वारे करणार ऊस लागवडीची नोंद

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२५-२०२६ चे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. १ जुलै २०२५ पासून ऊस लागवड करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लागण नोंद देण्यासाठी सभासदांची नेहमीच गर्दी होते. सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी चालू वर्षीपासून ऊस लागवड घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, कारखान्याने ऊस लागणीच्या नोंदीच्या धोरणामध्ये बदल केला आहे. एक जुलै व १६ जुलै रोजी लागवड केलेल्या उसाची नोंद लकी ड्रॉ (सोडत) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

याबाबत अध्यक्ष जाचक यांनी सांगितले की, नवीन पद्धतीनुसार एक जुलै रोजी को- एम ०२६५ व १६ जुलै रोजी को – ८६०३२ व पी. डी. एन. १५०१२ या जातीच्या उसाची लागवड नोंदणी अर्ज त्या दिवशी सकाळी सात ते १० वाजेपर्यंत गाव व विभागानुसार घेण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता लागण नोंदणी फॉर्मची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीप्रमाणे उसाची तोडणी होणार आहे. तर ऊसक्षेत्राची यादी पाच जुलैला लावली जाईल. सभासदनिहाय को – ०२६५ जातीच्या उसाची लागण नोंदीची यादी पाच जुलैला, तर को- ८६०३२ या व्हरायटीची व पी. डी. एन. १५०१२ या व्हरायटीची लागण नोंदीची यादी २० जुलै रोजी ग्रामपंचायत व सोसायटी कार्यालयास लावण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here