पुणे : राज्यातील साखर कारखान्यांमधील अधिकारी व कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या २३ जुलै २०२५ रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार १ एप्रिल २०२४ पासून मूळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्त्याच्या एकूण रकमेवर १० टक्के वाढ आणि सोयी-सुविधा देण्याचा करार झाला. या कराराची अंमलबजावणी करण्यास श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने तत्त्वतः मान्यता दिली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी ही माहिती दिली.
राज्यात सर्वप्रथम वेतनवाढ लागू करणारा कारखाना ठरण्याचा मान या कारखान्याने मिळवला आहे, अशी माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आली. वालचंदनगर शुगर वर्कर्स युनियनने २४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या करारात बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, १२ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव आदी उपस्थित होते.