पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील बाहेरील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांची नावे अनेक वर्षापासून मतदार यादीमध्ये आहेत, पण ते गेल्या १० ते १५ वर्षापासून गावात राहत नाही, अशा स्थलांतरित नावे स्थानिक पडताळणी व पंचनामे करून वगळण्यात यावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद माळी आणि मनसे संघटक प्रशांत खांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत विनोद माळी व प्रशांत खांडे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच पूर्व हवेलीतील थेऊर गावात अनेक मतदारांची नावे चक्क दुसऱ्याच मतदारसंघात बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच येथील १५ वर्षे बंद असलेल्या यशवंत साखर कारखान्यातील कामगाराची नावे अजूनही यादीत आहेत. यशवंत कारखाना बंद होऊन १५ वर्षे झाली आहेत. तेथील कामगार वर्ग हा थेऊर गावात व कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये राहत होता. आज तेथील कामगार वसाहत देखील रिकाम्या आहेत आणि येथील कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे त्यांची नावे वगळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.