पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या १०० एकर जमिनीच्या विक्रीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करून याप्रकरणी यशवंत बचाव सभासद कृती समितीने पुणे पोलिस आयुक्त आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज दिला आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांसह सदस्य राजेंद्र चौधरी, सागर गोते, अलंकार कांचन, आबा गायकवाड, लोकेश कानकाटे, बाळकृष्ण कामठे, सूर्यकांत काळभोर आदींनी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.
याबाबत लवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून जमीन विक्रीचा व्यवहार केला. जमिनीचे बाजारमूल्य सुमारे ५१२ कोटी रुपये असूनही ती केवळ २९९ कोटींना विकण्याचा ठराव केला. बाजार समितीने ३६ कोटी रुपये कारखान्याला हस्तांतरित केले. फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून व्यवहार केल्यामुळे शासनाचे मुद्रांक शुल्क बुडविण्यात आले. या व्यवहारामुळे कारखान्याला सुमारे दोनशे कोटींचा तोटा झाला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले, या तक्रारीत काहीही तथ्य नाही. कच्चा एमोयू करून आम्ही मार्केट कमिटीकडून ३६ कोटी घेतले. हा व्यवहार धनादेशाद्वारे झाला आहे. त्यातून बँकांचे कर्ज तडजोडीतून परतफेड करून जमिनीवर असलेला तारण बोजा कमी करून घेतला. हे करताना सुमारे १०५ कोटी रुपये कारखान्याचा फायदा केला. आम्ही हा व्यवहार तीन कोटी रुपये एकर भावाने केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या व्यवहारात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा घोटाळा नाही.












