पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून विजयी झालेले उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी सर्वसाधारण महिला राखीव गटातून विजयी झालेल्या संगीता बाळासाहेब कोकरे (पणदरे) यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ‘माळेगाव’च्या संचालिका म्हणून २५ वर्षे धुरा सांभाळली आहे. पुढील पाच वर्षात उसाच्या शेतात एआय तंत्रज्ञान आणून माळेगाव कारखान्याचा कायापालट करून दाखवणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल २५ जून रोजी जाहीर झाला. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकत सत्ता राखली. विरोधी गटाला एका जागेवरच समाधान मानावे लागले. त्यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव निवडून आले. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ५) निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या आधिपत्याखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.
दरम्यान, अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाचे संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे तक्रार केली आहे. सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार ऊस उत्पादक ‘अ’ वर्ग सभासदांनाच माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष होता येते. अजित पवार हे ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते ऊस उत्पादक सभासद नाहीत. त्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असे तावरे यांनी सांगितले.