पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया १२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेत विशेषतः ब वर्ग संस्था मतदार संघातून २१ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, ॲड. केशवराव जगताप आदींचा समावेश आहे. तावरे यांचा माळेगाव गटातून अद्याप अर्ज कायम आहे, तर जगताप यांचा पणदरे गटातून अर्ज कायम आहे.मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले. पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनेल प्रचाराचा प्रारंभ अजितदादांच्या उपस्थित माळेगावात होणार आहे.
दरम्यान, विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी सांगवी गावात कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याचे सांगितले. तावरे – पवार युती अथवा तडजोडीचा कोणताही विचार नाही. माळेगावच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे तावरे म्हणाले. युवराज तावरे, डॉ. मच्छिंद्र तावरे, डॉ. महेश कोकरे यांनी युवकांच्यावतीने आपली भूमिका मांडली. तर कारखाना निवडणूक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ५८ उमेदवारांसह कार्यकर्ते उद्यापासून (ता. ३१) गट निहाय सभासदांचा कानोसा घेण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिहाय दौरा सुरू होणार आहे, अशी माहिती शिवनगर शिक्षण संस्थेचे विश्वस्त गणपत देवकाते, गौरव जाधव यांनी दिली.