पुणे : यंदा परतीच्या पावसाचा अंदाज असल्याने सरकारने एक नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे दिवाळी उरकून ऊसतोड मजूर कारखान्याकडे येऊ लागले आहेत. मात्र, या प्रयत्नांवर पावसाचे पाणी पडत आहे. आता निवडक ऊस तोडी देऊन साखर कारखाने रडतखडत सुरू करावे लागणार आहेत. गाळप सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांनी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. ऊस तोडणी मजूरही मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. मात्र, पावसाने या मजुरांचे हाल होऊ लागले आहेत.
सध्या बीड, जालना, जळगाव जिल्ह्यांमध्येही पाऊस आहे. तर पश्चिम महाराष्ट्रालाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे या सर्व प्रवासात तोडणी मजुरांना पावसाचा त्रास होत आहे. साखर कारखान्यांवर जागा शोधून खोप उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तोडणी मजुरांची जनावरांना चारा शोधतानाही धावपळ होत आहे. साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी पुरेशी तोडणी यंत्रणा जुळवलेली आहे. तोडणी कार्यक्रमही आखला आहे असे सोमेश्वर साखर कारखान्याचे शेती अधिकारी बापुराव गायकवाड यांनी सांगितले. तर बीडच्या मुकादम संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ गोरे पाटील म्हणाले की, सध्या मजूर कारखान्यांकडे रवाना होत आहेत. मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पीक नसल्याने मजूर मोठ्या संख्येने कारखान्यांकडे जातील.












