पुणे जिल्ह्यात यंदा ५३ लाख मेट्रिक टनांनी अधिक ऊस गाळपाचा अंदाज

पुणे : पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टनाइतके अपेक्षित ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात गतवर्ष २०२४-२५ मध्ये सुमारे १ कोटी १४ लाख ४६ हजार मेट्रिक टनाइतके कारखान्यांनी पूर्ण केले होते. याचा विचार करता गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे ५३ लाख मेट्रिक टनांनी ऊस गाळप वाढण्याचा प्राथमिक अंदाज पुणे प्रादेशिक साखर सह संचालक नीलीमा गायकवाड यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात गतवर्षी बंद असलेला अनुराज शुगर्स हा खाजगी कारखाना यंदाचा ऊस गाळप हंगाम घेणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ९ सहकारी व ६ खाजगी मिळून १५ साखर कारखाने सुरू राहतील आणि या कारखान्यांकडून ऊस गाळप परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १ लाख ४ हजार ५०० मेट्रिक टनाइतकी आहे. याचा विचार करता १६० दिवस साखर कारखान्यांचा हंगाम सुरू राहू शकतो. म्हणजेच १५ एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात बारामती ॲग्रो या खाजगी कारखान्याकडून सर्वाधिक म्हणजे २१ लाख मे.टन उसाचे गाळप केले जाणार असून त्या खालोखाल दौंड शुगर या खाजगी कारखान्याकडून १५.७३ लाख मे. टन गाळप केले जाणार आहे. तर त्यानंतर माळेगांव सहकारी व कर्मयोगी सहकारीकडूनही प्रत्येकी १५ लाख मे. टन गाळपाचा प्राथमिक अंदाज आहे. तर ‘सोमेश्व’कडून १३.९७ लाख मे. टन ऊस गाळप अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here