पुणे : इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती अॅचग्रो युनिट आदी कारखाने आहेत. शेजारच्या बारामती, दौंड तालुके व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा डोळा इंदापूर तालुक्यातील उसावर असतो. त्यामुळे तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदाच्या हंगामात इंदापूर तालुक्यात २९ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. मात्र, आताच तालुक्यातील सुमारे ६० टक्के पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागले आहेत. त्यामुळे उसाचे वजन व साखरे प्रमाण घटन्याची शक्यता आहे.
हवामान बदल, गेल्यावर्षी दीर्घ काळ पडलेला पाऊस, कमी सूर्यप्रकाश, रात्रीचे कमी तापमान, रासायनिक खतांच्या अमाप वापराने जमिनीतील नायट्रोजन व फॉस्फरस या अन्नद्रव्यांचा ऱ्हास होतो झाला आहे. त्यामुळे उसाला तुरे आले आहेत. खरेतर तुरे आल्यानंतर प्रथमतः साखरेचे प्रमाण वाढते, मात्र ३-४ महिन्यांनंतर ते झपाट्याने कमी होते. उसाच्या वाढ्याची प्रत खालावते. याबाबत महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे म्हणाले की, उसाला तुरा येणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे उसाचे वजन घटते. उसातील साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर पदार्थांमध्ये होते. आपल्याकडे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या ८६०३२ व को २६५ या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ८६०३२ या जातीच्या वाणात तुरे येण्याचे प्रमाण नगण्य असते. परंतु यावर्षी तुरे लवकर आल्याचे जाणवत आहे. उसाचे लवकर गाळप केल्यास वजन व साखर उताऱ्यातील नुकसान टाळता येणे शक्य आहे.

















