पुणे : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक या प्रदर्शनामध्ये गुरुवारी (दि. २२) राज्यातील परभणी, अकोला, लातूर, बुलढाणा, सोलापूर, कोल्हापूर येथील जिल्ह्यांमधून येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती. यावेळी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिकाची माहिती घेण्यात अधिक रस दाखवला. ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
परंपरागत पद्धतीने पिके घेण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीसाठी वापर केला तर काय होते? याचे प्रात्यक्षिक येथील शेतकऱ्यांना पाहायला मिळाले. कृषकमध्ये एकाच वेळी शेतकऱ्यांना परंपरागत पद्धतीने घेतलेला ऊस आणि एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनीही त्याबाबत जाणून घेण्यात मोठा रस दाखवला. पशु प्रदर्शनात कोंबड्या, गाय व विविध जातींच्या म्हैस, शेळ्या यांची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. कृषी विज्ञान केंद्रावर ऊसपिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग केला गेला आहे. यातून पाणी, खतांची मात्रा, रासायनिक किटकनाशके यांच्या खर्चात बचत होऊन अधिकाधिक उत्पादन कसे मिळते, याची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी खर्चात निम्म्याने बचत व उत्पन्नात भरीव वाढ असा दुहेरी फायदा कसा मिळवता येतो, याची माहिती घेतली.

















