पुणे : शेतकऱ्यांनी खात्री करण्यासाठी तुमच्या उसाचे वजन कुठेही करावे, तरीही आम्ही तुमच्या उसाचे गाळप करू, असे आश्वासन देऊन ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी पारदर्शकतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. या निर्णयामुळे ओंकार शुगर ग्रुपच्या राज्यातील १७ साखर कारखान्याच्या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. कारखान्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ऊसदरात नेहमीच आघाडीवर असलेला ओंकार शुगर ग्रुप वजन प्रक्रियेतही प्रामाणिकतेचा आदर्श ठरला आहे.
राज्यातील बहुतांश कारखान्याच्या वजन काट्याबाबत आणि होत असलेल्या उसाच्या वजनाबाबत गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. खात्री करण्यासाठी खासगी काट्यावर वजन केले तर कारखाना ऊस घेणार नाही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वजनात काटामारी होण्याचा संशय शेतकऱ्यांच्या मनात कायम होता. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासाचे नवे पर्व सुरू करून ओंकार शुगर ग्रुपने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील उसाच्या वजनाबाबत वर्षानुवर्षांची शंका आणि भीती दूर केली. त्यामुळे शेतकरी निर्धास्तपणे ऊस तोडणी, नोंदी देण्याबाबत पुढे येऊ लागले आहे. श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह मोकाशी यांनी वजन काट्याबाबत ओंकार शुगर ग्रुपने दाखवलेली पारदर्शकता ही खरी साखर धंद्यातील ओळख आहे. इतर कारखान्यांनीही हा उपक्रम राबवून आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
















