पुणे : शेतकरी संघटनेचा आज साखर आयुक्तालयावर मोर्चा, उसाला जादा दर देण्याची मागणी

पुणे : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे नेते दिवंगत शरद जोशी यांच्या स्मृति दिनानिमित्त १२ डिसेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्तालय कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने उसाला चांगला दर द्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, कारखान्यातील अंतराची अट शासनाने रद्द करावी, साखर आयुक्तालयाचे नाव बदलून ऊस आयुक्तालय करावे, काटा कारखान्यांची मारणाऱ्या नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतकरी संघटनेची जागर यात्रा गुरुवारी निरा येथे आली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात स्वागत केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला जात असून, आत्महत्येच्या मार्गावर जात आहे असे सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत असे ते म्हणाले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण वडले, शिवाजी नांदखिले, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक निगडे, रणसिंग पवार, ह.भ.प. माणिक महाराज पवार, किरण कुमठेकर, सरवरभाई पठाण, विजय हिरवे आदींसह बारामती, पुरंदर परिसरातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here