पुणे : राजुरी येथील दावलमालिक परिसरातील नियोजित जुन्नर शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या उभारणीला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी विरोध केला आहे. राजुरी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळास विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे. कारखान्याचे काम सुरू केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कारखान्यामुळे शेती धोक्यात येणार असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांचा आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्यासाठी झाडे तोडणे सध्या सुरू आहे. कारखान्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होणार आहे. वायू, जल तसेच ध्वनी प्रदूषणामुळे शेती धोक्यात येणार आहे. नियोजित साखर कारखान्यालगत वन खात्याचे मोठे जंगल आहे. यातील वन्यप्राणी, पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. येथील जीएमआरटी सॅटेलाइट अँटिनाला अडथळा निर्माण होऊ शकतो. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरात कारखान्याच्या निघणाऱ्या वायू अथवा धुरामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊ नागरिकांच्या आरोग्यास हानी होऊ शकेल.