पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता ३१०० रुपये

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसास पहिला हप्ता ३१०० रुपये प्रति टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

गळीत हंगाम सन २०२५-२६ चे धोरण ठरविणेसाठी २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या धोरणानुसार मागील हंगामाच्या १२ टक्के साखर उताऱ्यानुसार निव्वळ एफआरपी ३२७२.१४ रुपये प्रति टन येत आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार पहिल्या हप्त्यापोटी ३१०० रुपये प्रती टन पंधरवडा बिलाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे. उर्वरित रक्कम १७२.१४ रुपये देखील निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने नेहमीच फक्त एफआरपीच नाही तर त्यापेक्षाही जास्त ऊस दर दिलेला असून कधीही ऊस दराबाबत तडजोड केलेली नाही, असे अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले.

दरवर्षी ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून विविध कार्यकारी सोसायटीची वसुली सक्तीने करण्यात येत असे, तथापि शासनाचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या विनंतीनुसार वसुली सक्तीची न करता संमतिपत्र घेऊन ऐच्छिक पद्धतीने करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस पेमेंटमधून सोसायटी कर्जाची कपात करावी किंवा नाही, याबाबत संबंधितांनी सोसायटी बँकेस कळविणे आवश्यक आहे, असे अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here