भोर : राजगड साखर कारखाना राज्यात एक रोल मॉडेल ठरावा यासाठी प्रयत्न आहेत. त्यासाठी चार नवे प्रकल्प राबविले जात आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतिदिन ४९५० मे. टन गाळप क्षमता, १४.०५ मेगावॅट क्षमतेचा को-जनरेशन प्रकल्प, ९० केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प आणि १२ टन क्षमतेचा सिबीजी गॅस निर्मिती प्रकल्प या चार प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल अशी माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. अनंतनगर निगडे येथे राजगड कारखान्याच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्यासाठी ४६७.८५ कोटी मंजूर झाले असल्याचे सांगत थोपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे आभार मानले.
यावेळी राजगड कारखान्याच्या संचालकांनी मशागतीनंतरचा ऊस उत्पादनाचा खर्च कारखाना करेल अशी घोषणा केली. कारखाना कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना ऊस लागवड तंत्रज्ञान, ऊसाची रोपे, खते, औषधे शेतकऱ्याच्या बांधावर पोहोच करेल असे सांगितले. त्यासाठीचा खर्च कारखान्याच्यावतीने सुरुवातीला केला जाईल. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वीची मशागत केल्यावर पुढील खर्च कारखाना करणार आहे असा निर्णय संचालकांनी जाहीर केला. यावेळी सर्व संचालक, माजी संचालक आबासाहेब यादव, भाजप सरचिटणीस बाळासाहेब गरूड, भोर तालुका दक्षिण अध्यक्ष संतोष धावले, अतुल किंद्रे, शैलेश सोनवणे, दिनकर सरपाले, आकाश वाडघरे, दिनकर कुडले, नाना राऊत, गणेश खुटवड, नितीन बांदल उपस्थित होते. कार्यकारी संचालक भागवत आवाड यांनी सूत्रसंचालन केले. संचालक शिवाजी कोंडे यांनी आभार मानले.