पुणे : गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसाचा फटका पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला बसला आहे. त्यातही सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या तिन्ही साखर कारखान्यांचा तब्बल साठ हजार एकर क्षेत्रावरील आडसाली ऊस लागवड हंगाम अडचणीत आला आहे. यावर्षी मशागतींना सुरवात करण्याआधीच तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ४०० मिलिमिटर पाऊस झाला. चाऱ्या, नाले, पाट तुडुंब वहात आहेत. त्यामुळे शेतातले पाणी आटायला पंधरा दिवस आणि वाफसा येण्यासाठी पुढचे पंधरा दिवस लागतील. अशा संततधार पावसामुळे १५ जून ते एक जुलै या कालावधीत ऊस लागवड होणार नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती या तिन्ही कारखान्यांकडे एक ते सव्वा लाख एकर एवढे ऊस क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास पन्नास टक्के ऊस आडसाली असतो. आडसाली लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी त्याला प्राधान्य देतात. कारखान्यांनाही उत्कृष्ट साखर उताऱ्याचा, वजनाचा ऊस मिळतो. या ऊस तोडीला लवकर क्रमांक मिळावा यासाठी शेतकरी एक जुलै हा लागवडीचा मुहूर्त पकडतात. मात्र, यंदा अतिवृष्टीने एक जुलैच्या लागवडी खोळंबणार आहेत असे सोमेश्वरचे शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले की, या पार्श्वभूमीवर उसाच्या रोपलागवडीचा, खरिपाचे पीक घेऊन पूर्वहंगामी ऊसलागवडीचे पर्यायही शेतकरी काढतील. चांगल्या पावसाने एकूण लागवडीत वाढ होईल. तर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले की, ऊस लागवड हंगाम १५ जुलै करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चर्चा झाली आहे. तिन्ही कारखान्यांचे एक धोरण ठेवण्याबाबत विचार करू.