पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गुरुवारपर्यंत, चालू गळीत हंगामातील ११७ दिवसांत दैनंदिन साडेनऊ हजार टन प्रतिदिन अशा उच्चांकी क्षमतेने ११ लाख ७ हजार टन गाळप केले आहे. दैनंदिन साखर उतारा तब्बल १३ टक्के आहे. कारखान्याने जिल्ह्यात ११.७४ टक्के असा सर्वाधिक उतारा प्राप्त करत १२ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. कारखान्याने पहिली उचल एकरकमी ३३०० रूपये प्रतिटन दिली आहे. मात्र, १ फेब्रुवारीपासून तुटणाऱ्या उसाला ३४०० रुपये उचल अदा केली आहे. तर १ मार्चपासून तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन एकरकमी उचल देणार आहोत, अशी माहिती संचालक मंडळातर्फे देण्यात आली.
कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, कारखान्याचा अंतिम सरासरी उतारा १२ टक्क्यांच्या पुढेच असेल. हंगामाच्या सुरवातीलाच साडेतेरा ते चौदा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले की, सध्याच्या गाळपात सोमेश्वर कारखाना जिल्ह्यात तिसरा तर राज्यात आठवा आहे. साखर उताऱ्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. गळीत हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालेल. कारखान्याने ६७ हजार क्विंटल साखर दोन टप्प्यांत निर्यात केली आहे. उरलेला १६ हजार ५०० क्विंटल कोटा आणि नव्याने मिळणार असलेला कोटा जागतिक बाजार पाहून निर्यात केला जाणार आहे असे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले.


















