पुणे : छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत ३३९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दि. ७ ते ९ एप्रिल या तीन दिवसांमध्ये ११५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु शुक्रवारी एका दिवसामध्ये २२४ एवढ्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज दाखल होण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत आहे. सलग सुट्ट्यांमुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचा एकच दिवस मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवार, त्यांचे सूचक व अनुमोदक तसेच सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मंगळवारी (दि. १५) देखील मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. कारखान्याचे सभासद सतीश काटे यांनी सांगितले की, कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्यामुळे उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत जे कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी लढत राहिले, त्यांचा विचार या निवडणुकीत होईल का? असा प्रश्न पडतो.











