पुणे : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत साखर कारखान्यांकडून ८३ लाख १० हजार ७५९ मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर सरासरी ९.१३ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार सुमारे ७५ लाख ८७ हजार १४९ क्विंटलइतके साखर उत्पादन तयार झाले आहे. यंदाच्या हंगामात १४ साखर कारखान्यांकडून गतीने ऊस गाळप सुरू आहे. गाळप क्षमता सर्वाधिक असल्याने बारामती ॲग्रो व दौंड शुगर या दोन खासगी कारखान्यांचा सर्वाधिक ऊस गाळपात अग्रक्रम कायम आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारीने ११.३२ टक्के निव्वळ साखर उतारा मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बारामती ॲग्रोकडून दररोज १८ हजार मे.टन तर दौंड शुगर या खासगी कारखान्यांकडून दररोज १७ हजार ५०० मे.टन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. या दोन कारखान्यांकडून मिळून ३५ हजार ५०० मे.टन (२८ टक्के) ऊस गाळप होत आहे.
पुणे जिल्ह्यात यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामात एकूण १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप होण्याचा हंगामाच्या सुरुवातीचा अंदाज होता. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८३.१० लाख मेट्रिकटन ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८४.०७ लाख मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण होणे बाकीच आहे. म्हणजेच जवळपास ५० टक्के ऊस गाळप कारखान्यांकडून पूर्ण झालेले आहे. यापुढेही ऊस गाळप जोमाने सुरू राहण्याची अपेक्षा असून १५ ते २० मार्चपर्यंत पुणे जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम चालण्याची अपेक्षा आहे,अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकारी शेषराव डोळे यांनी दिली. बारामती अॅग्राने १४ लाख ६९ हजार ७६८ मे.टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ८.२१ टक्के उताऱ्यानुसार साखरेचे ११ लाख ८३ हजार ८१० क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केलेले आहे. त्या खालोखाल दौंड शुगर प्रा. लि. या खासगी कारखान्याकडून १३ लाख ७ हजार ३६० मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे.















