पुणे : जिल्ह्यात साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखाना प्रथम तर ‘श्री छत्रपती’चा दुसरा क्रमांक

पुणे : जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांमध्ये सोमेश्वर, माळेगाव आणि श्री छत्रपती कारखाना हे तीन साखर कारखाने उसाचे गाळप, साखर उत्पादन व साखर उतारा मिळवणे यामध्ये आघाडीवर असतात. यावर्षीच्या गाळप हंगामामध्ये साखर उताऱ्यात सोमेश्वर कारखाना प्रथम आहे. तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याला साखर उताऱ्यात मागे टाकून आघाडी घेतली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यापेक्षा ०.१६ टक्के जास्त साखर उतारा श्री छत्रपती कारखान्याने मिळवला आहे. साखर उताऱ्याच्या बाबतीत सोमेश्वर कारखाना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर असून या कारखान्याने सरासरी ११.१० टक्के साखर उतारा मिळवलेला आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने साखर उता-यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आघाडी मिळवत १०.८५ टक्के सरासरी साखर उतारा मिळवला आहे.

साखर उत्पादन ‘सोमेश्वर’ची बाजी…

सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २५ हजार ८०३ टन उसाचे गाळप करून ५ लाख ८१ हजार १०० क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. माळेगाव कारखान्याने ५ लाख ६ हजार ९५४ टन उसाचे गाळप करून ५ लाख ३२ हजार २०० क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. श्री छत्रपती कारखान्याने ४ लाख ३३ हजार २९५ टन उसाचे गाळप करून ४ लाख ६१ हजार २०० क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. या साखर कारखान्यांनी गाळप हंगामाचे ५६ दिवस पूर्ण केले आहे.

श्री छत्रपतीचे १२ लाख टन गाळपाचे टार्गेट…

श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यांमध्ये गाळप हंगामाचे योग्य नियोजन झाल्यामुळेच कारखान्याला जास्तीत-जास्त साखर उतारा मिळत आहे. संचालक मंडळाने १२ लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह संचालक मंडळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप आपल्याच कारखान्यात करावे, असे आवाहन सभासदांना वेळोवेळी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here