पुणे : जिल्ह्यातील शिरूरच्या पूर्व भागात सध्या गुऱ्हाळचालकांकडून उसाला साखर कारखान्यांपेक्षा जास्त म्हणजेच प्रतिटन ३५०० ते ३६०० दर जाहीर केला जात असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळांना ऊस पाठवण्यास प्राधान्य देत आहेत. याचा फटका साखर कारखान्यांना बसत असून, फेब्रुवारीच्या १५ ते २० तारखेपर्यंतच या भागातील काही कारखाने सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारखाने उसाला प्रतिटन ३१०० ते ३२०० रुपये दर देत आहेत.
दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चालू गाळप हंगामात शिरूरच्या पूर्व भागात इतर जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे ऊसतोड कामगार दाखल झाले होते. कांदा लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस लवकर कारखान्यांना दिला. मात्र, हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिल्याने त्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे.
गुऱ्हाळांना उसाची कमतरता भासू लागल्याने गुऱ्हाळ चालकांनी ऊस दरात मोठी वाढ केली आहे. परिणामी, उरलेला ऊस असलेले शेतकरी कारखान्यांऐवजी गुऱ्हाळांकडे ऊस वळवत आहेत. मांडवगण फराटा परिसरातील शिरसगाव काटा, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, नागरगाव, कोळगाव, आंधळगाव आदी गावांमध्ये बाहेरगावी असलेल्या खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या ऊसतोड्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या होत्या. सध्या कारखान्यांच्या तुलनेत गुऱ्हाळांकडून अधिक दर व एका महिन्यात पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी गुऱ्हाळांना ऊस देण्यास पसंती देत आहेत.















