पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे दि. १६ डिसेंबर २०२५ पासून सभासदांचा आलेल्या तसेच पुढे येणाऱ्या ऊसाच्या बिलातून कोणतीही सोसायटी किंवा व्यापारी बँकांची कर्जवसुली करण्यात येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय संचालक मंडळाच्या मासिक सभेत घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
अध्यक्ष जगताप म्हणाले की, शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) ३,२८५ प्रति टन इतका निश्चित झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रुपये ३,३०० प्रति टन देण्याचा निर्णय घेतला आहे. दि.१५ डिसेंबरपर्यंत कारखान्याकडे आलेल्या उसाची सर्व बिले अदा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याने आजअखेर ६ लाख ३४ हजार १३५ टन उसाचे गाळप पूर्ण केले असून जिल्ह्यात ११.२७टक्के इतका उच्चांकी साखर उतारा राखत ७ लाख १० हजार ६५० किंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
जगताप म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी झाल्यास शेतकी खात्याशी संपर्क करावा, सभासदांनी ऊस जळीत करून तोडणी करण्यास संमती देऊ नये. या निर्णयामुळे ऊस बिलातून थेट कर्ज वसुलीचा ताण कमी होणार असून शेतकऱ्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा हातभार लागणार आहे.
















