पुणे : राज्यात सुमारे अडीच हजार ऊसतोडणी मशिनयंत्रे कार्यरत आहेत. तर, साधारणतः १८० ते २०० लाख मेट्रिक टन उसाची तोडणी ही यंत्राद्वारे होते. या ऊस तोडणीचा दर प्रतिटन ५०० रुपयांवरून ७०० रुपये करावा या मागणीसाठी शनिवार (दि. १ नोव्हेंबर) पासून राज्यातील ऊस तोडणी मशिनमालक काम बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटनेने दिला आहे. संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप अहिरेकर, शिवानंद मुगळे, लालासाहेब कदम, अवधूत सपकाळ, विनोद सूर्यवंशी, सुनील चव्हाण, योगेश शिवले आदींसह राज्यभरातील संघटनेच्या सभासदांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना याबाबत निवेदन दिले.
याबाबत संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांनी सांगितले की, शासन आदेशानुसार ऊस तोडणी मशीन मालक व वाहतूकदार यांच्या बिलातून ऊस पाचट कपात करू नये आणि ऊसतोडणी दरासंदर्भात त्रिस्तरीय समिती स्थापन करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ऊसतोडणीचा दर हा वाढून आम्हाला ७०० रुपये प्रतिटन मिळावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय दि. १२ ऑक्टोबर २०२२ नुसार ऊसतोडणी यंत्राने (हार्वेस्टर ) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या उसाचे तोडणी व वाहतुकीअंतर्गत आहे. त्यामुळे ऊसतोडणी यंत्रधारकांच्या बिलातून पाचटासाठी कोणतीही कपात करण्यात येऊ नये. साखर कारखाने ऊस पाचट वजावट साडेचार टक्के करतात. त्याचा फटका मशीन चालकांना बसत आहे. यावर निर्णय न झाल्यास ऊसतोडणी मशिन बंद ठेवू असा इशारा त्यांनी दिला.









