पुणे : माळेगाव साखर कारखान्याने यंदा मागील हंगामाच्या तुलनेत साखर विक्रीत प्रति क्विंटल सुमारे ६० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, कारखान्याच्या व्यवस्थापनाने खरेदी, वाहतूक आणि इतर खर्चामध्ये काटकसर करत ७ ते ८ कोटी रुपयांची बचत साधली आहे. ही बचत आणि वाढलेला साखर दर लक्षात घेता कारखान्याने २०२४- २५ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक सभासदांना ३,६५१ रुपयांचा अंतिम दर जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने कारखान्याचे चेअरमन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे निवेदन कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी स्वीकारले.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी २०२३- २४ मध्ये माळेगाव कारखान्याने ३६३६ रुपयांचा उच्चांकी दर दिला होता, ज्याचे कौतुक राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीरपणे केले होते. अजित पवार हे सध्या माळेगाव कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अंतिम दर ३६५१ रुपये जाहीर केला जातो का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. कारखान्याला को – जनरेशन आणि इतर उपपदार्थांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सभासदांची दिवाळी गोड करावी. गेल्या हंगामापेक्षा अधिक दर जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.