पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी बारामती निवडणूक कार्यालयात अधिकारी यशवंत माने यांच्या आधिपत्याखाली चिन्ह वाटप कार्यक्रम पार पडला. निळकंठेश्वर पॅनेलला कपबशी तर सहकार बचाव शेतकरी पॅनेल किटली चिन्ह दिले. बळिराजा पॅनेलला तुतारी हे चिन्ह मिळाले. याप्रसंगी चिन्हे मिळवण्यासाठी सातव व तावरे या दोन्ही गटात प्रचंड आरडाओरड आणि बाचाबाची झाली. हा गोंधळ आवरण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप करावा लागला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड घटनास्थळी आले. निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधार घेत प्रथम येणाऱ्या उमेदवारांना मागणीनुसार चिन्ह दिले.
शुक्रवारी (ता. १३) बारामती निवडणूक कार्यालयात जोरदार रस्सीखेच झाली. निळकंठेश्वर पॅनेलच उमेदवार नितीन सातव यांनी कपबशी चिन्ह मिळण्यासाठी सुरवातीपासूनच जबरदस्त फिल्डिंग लावली होती. सातव हे पहाटेपासून चिन्ह मिळविण्यासाठी रांगेत थांबले होते. तर विरोधी गटाचे प्रमुख रंजन तावरे नंतर आले. त्यांनी रांग सोडून कार्यालयात प्रवेश केला. त्यामुळे रांगेतील उमेदवारांनी त्यांना विरोध केले. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सातव यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला कपबशी हे चिन्ह दिले, तर तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेल किटली चिन्ह दिले. बळिराजा पॅनेलला तुतारी हे चिन्ह मिळाले. निळकंठेश्वर पॅनेलचे समर्थक स्वप्नील जगताप, विजय तावरे, किरण तावरे, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, डी. डी. जगताप आदी कार्यकर्ते विरुद्ध विरोधक रंजन तावरे, युवराज तावरे, अजिंक्य तावरे आदींमध्ये बाचाबाची व आरडाओरड झाली.