पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या प्रगतीच्या वाटचालीला पुढे नेत कारखान्याने केवळ साखर उत्पादनातच नव्हे, तर उपपदार्थ निर्मितीतही भरीव यश संपादन केले आहे. कारखान्याने गेल्या ११३ दिवसांत १० लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ११ लाख ३५ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.४५ टक्के इतका समाधानकारक मिळाला आहे. कारखान्याने गेटकेन उसाच्या आधारे यंदा १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून मार्चअखेरपर्यंत ऊस गाळपाचे नियोजन आखण्यात आले आहे, अशी माहिती उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी दिली.
यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळाने ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार तसेच अधिकारी- कर्मचारी यांचे अभिनंदन केले. उपाध्यक्ष कोकरे यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. सहवीज प्रकल्पातून सात कोटी ९१ लाख ८२ हजार ३०० युनिट वीजनिर्मिती झाली असून त्यापैकी चार कोटी ६३ लाख ३३ हजार २०० युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे. कारखान्यात दिवंगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव रिक्त संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे असे सांगण्यात आले.


















